माझ्या पुतणीला बस स्टॉप वर सोडायची जवाबदारी आज माझ्यावर होती. तबला वादनाची तिची सुरू असलेली अनेक वर्षांची साधना आणि त्यातून साधलेलं कौशल्य एका मोठ्या व्यासपीठावर सादर करण्याची दुर्लभ संधी साधून आली होती. आणि आपले गुरु आणि सहकाऱ्यांसोबत ती शहराकडे निघाली होती.
बसची वेळ ८.३० ची ठरलेली. आणि बस स्टॉप घरापासून अगदी २ मिनिटांच्या अंतरावर. म्हणून ८.२५ ला ‘१० मिनिटात हिला सोडून येतो’ असा पुकारा करून आम्ही निघालो. एक पाठीवर घेता येईल इतकी छोटी बॅग आणि प्रचंड उत्साह सोबत घेऊन स्वारी मजेत गाडीत येऊन बसली. बस तयार उभीच होती. सोयीस्कर ठिकाणी गाडी लाऊन आम्ही बस जवळ चालत गेलो. सगळीकडे नुसती लगीनघाई! तबले, डग्गे, हार्मोनियम आणि अनेक वाद्ये छोट्या गाड्यातून काळजीपूर्वक बस मध्ये नेले जात होते. छोट्या मोठ्या सगळ्याच कलाकारांच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह, मिश्किल पणा, आत्मविश्वास आणि कुतूहल ह्या सगळ्याच्या मिश्रणातून जो कुठला भाव तयार होत असेल तसला भाव दिसत होता. हे सगळे कलाकार म्हणजे ह्या वर्षी झालेल्या जास्तीच्या पावसाने भरभरून वाहणाऱ्या झऱ्यांसारखे आनंदाचे झरेच जणू वाटत होते आणि ह्या आनंदाच्या झऱ्यात चिंब भिजत मी कसा बस जवळ रेंगाळलो हे मलाच उमगलं नाही.
आजचा काळ म्हणजे सगळच विभक्त होत जाणारा काळ. रोज संध्याकाळी जेवणं झालीत की गावच्या मध्यभागी असलेल्या वडाखाली गप्पा मारत बसणारी मंडळी TV च्या मालिकांमध्ये रमली आणि विभक्त झालीत. सुबत्ता वाढली आणि सोबत आर्थिक असुरक्षितता आली आणि बघता बघता गुण्या गोविंदाने एकत्र राहणारी कुटुंबे विभक्त झाली. ‘हम दो, हमारे दो’ चा काळ आला आणि आई वडिलही दूर गेलेत आणि सरते शेवटी विभक्त नवरा बायकोनी अधून मधून ठरल्या वेळी मुलाला भेटायला जाणारा काळ आला. सगळे मित्र सोशल मीडियावर गेलेत आणि सुख दुःखाच्या वेळी राहीला फक्त एकटेपणा.
अश्या ह्या एकटेपणाच्या काळात संगीताने जोडली गेलेली ही २५ कलाकारांची टोळी एकत्र येऊन संघ भावनेने आपली प्रतिभा सादर करण्यासाठी निघाली होती. परीक्षेतले ते मार्क्स, जीवघेणी स्पर्धा ही ह्या मुलांच्यापण वाटेला पूजलेलीच. पण इथे मात्र एक वेगळचं चित्र, एकमेकांना मदत करत, एकमेकांना प्रोत्साहन देत, आपल्या गुरूंची पण काळजी घेत नकळत होत असलेला थक्क करणारा सांघिक प्रयत्न. हे ह्या मुलांना मुद्दामहून शिकवलं गेलं असेल का? की संगीतकलेच्या एका शुद्ध अनुभवाचा हा परिणाम असेल…मला उत्तर कळलं होतं.
ह्या मुलांचे संगीत गुरु म्हणजे आमच्या आडवाटेला असलेल्या छोट्याश्या गावाला मिळालेलं सरस्वतीचं वरदान! आपलं अवघं आयुष्य त्यांनी संगीत सेवेला आणि आपल्या विद्यार्थ्यांना वाहून घेतलेलं. किती मोठी ही तपश्चर्या आणि निष्ठा! प्रत्येक बाबतीत गरजेपेक्षा जास्त पर्याय उपलब्ध असणारी ही विद्यार्थ्यांची पिढी. कुठल्याही एखाद्या गोष्टीवर पुर्णपणे निष्ठा ठेऊन वाहून घेण्याची गरजच कधी न भासणारी. अश्या ह्या मुलांना आपल्या गुरूच्या तपश्चर्येतून आपल्या संगीत ध्येयाला वाहून घेण्याची किती प्रेरणा रोज मिळत असेल! ह्या संगीत प्रेमाने मिळालेला प्रत्येक चेहऱ्यावरचा आत्मविश्वास टिपत मी बराच वेळ तसाच उभा होतो.
पुतणीला बस स्टॉपवर सोडायचं खरं साधसच काम. पण कलेच्या सानिध्यात आल्यावर सगळच कसं मंत्रमुग्ध करणारं असतं ह्याचा अनुभव मला येत होता. संगीत, चित्रकला, खेळ, साहित्य आणि इतरही कला छंद इत्यादित रममाण होणारी माणसं वेगळी का दिसतात ह्याचा अनुभव मला येत होता. आयुष्याच्या शर्यतीत धावतांना मनाने आणि शरीराने थकून गेलेल्या माणसाला क्रियाशीलतेचा अद्भुत आनंद देणाऱ्या जगात ह्या गोष्टी घेऊन जातात आणि ह्या आनंदाने चेहऱ्यावर येणारं समाधानचं मोल करणं अशक्य होऊन जातं!
२०२४ च्या दसऱ्याच्या सुमारास सीमोल्लंघन करायला निघालेली ही संगीत सेना विजयी होणार हे नक्कीच होतं. आणि मला तर त्यांनी ह्या बस स्टॉप वरच जिंकून घेतलं होतं.
किती छान लिहिलंय…..
खूप सुंदर आणि समर्पक !!
👌👌👌
Thanks Madhu tai!
अप्रतिम!!!
हा ब्लॉग वाचताना “कट्यार काळजात घुसली” हया चित्रपटातील प्रधान ह्यांचा विद्या आणि कला यातील तफावत सांगणारा प्रसंग आठवला!! खरोखर आपण सगळेच विद्या मिळवण्यासाठी, मिळालेल्या विद्येचा वापर करून अर्थार्जन करण्यासाठी सतत धडपडत असतो. घरापासून आणि पर्यायाने आपलेपणापासून लांब जात असतो.पण कला हे अशी गोष्ट आहे जी माणसाला “माणूस” म्हणून जतन करून ठेवते!
ह्या अशा कलेच इतकं सुंदर, समर्पक आणि अतिशय कमी पण योग्य शब्दात वर्णन केल्याबद्दल तुमचं अभिनंदन! आणि ही कला जोपासणाऱ्या त्या गुरुंच आणि कलेचा वसा पुढे नेणाऱ्या त्या सर्व मुलांचं खूप खूप कौतुक आणि शुभेच्छा!
ता.क.- अतिशय साधा, सुटसुटीत पण मनाला भावणारा मराठी मजकूर वाचायला मिळाला!!
शुभेच्छा🪷
Thanks Sayali. Wonderfully expressed as always.
कौटुंबिक जबाबदारी पार पाडतांना आलेला अनुभव शब्दातुन व्यक्त करताना हळूवारपणे उलगडलेले अमित दादा आज पहावयास मिळाले.. दादा आपले संगीत साधने वरील प्रेम, आपण दर्शवलेली मुलांची निरागसता,एकत्रित व विभक्त कुटुंबाचे मूल्यमापन,गुरु -शिष्या ची आत्मीयता,सोशल मिडियाचे परिणाम अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेत…एक शिष्य म्हणून मी आपणास वंदन करते.
तसेच स्वरा (पुतणी) व टीमच्या संगीत सेनेस खुप खुप शुभेच्छा… 💐💐
धन्यवाद स्नेहा 😊
अमित तुझे लिखाण खरच खुप चांगले आहे.
आणी एवढी छोटीशी गोष्ट फक्त्त स्वरा ला बस स्टॉप वर सोडायचं ते तु किती चांगल्या पद्धतीने मांडले खरंच सुंदर.
असेच पुढेही लिहीत रहा 🙏
Thanks dada.
वा अमित ,खूपच छान
Thanks a lot.
आपण खरोखरच सगळ्या पालकांच्या मनातील भावना शब्द रूपाने अतिशय सुरेख पद्धतीने मांडले गुरुवंदनीय आहेतच शंका नाही शिष्य हे फार भाग्यशाली आहेत चोपड्या सारख्या गुरु मिळाले मुलांमध्ये असलेला आत्मविश्वास निर्माण करण्याची शक्ती गुरूंजवळ होती म्हणूनच ते गुरूंची काळजी घेत कार्यक्रम यशस्वी करून दाखवला व आपण शब्द रूपाने मांडलेले विचाराने मी पण भारावून गेलो
आपले मनापासून आभार.
खुप छान लिहिलंय आपण. संगीत सेनेला शुभेच्छा.
वाचताना मी माझ्या आठवणीत रममाण झालो. बालपणीची आकाशवाणी केंद्राची शाळेमार्फत झालेली गाण्यांसाठी ची भेट…
आपली प्रतिक्रिया वाचून खूप आनंद झाला. धन्यवाद.
दादा, खूपच सुंदर लिहिलंय.. मनाला स्पर्श करणारे लिखाण..
Thanks Parag
डाॅ.अमित, आपलं स्टेजवरचं लाघवी बोलणं ऐकलं होतं .
आता संगित विषयक सुंदर विचार वाचलेत.
छंदात आणि कलेत जे सामर्थ्य असतं, त्याची चुणूक, झलक अन् मानसिक समाधान –अवस्था यांचं जवळून दर्शन झालं. !
अभिनंदन सहर्ष.
मनःपूर्वक धन्यवाद सर.
एका साध्या प्रंगावर येवढा संवेदनशील विचार! सुंदरच!
Thanks a lot.
Very touching and real!
Thanks
अमित ,
सस्नेह नमस्कार
अतिशय उत्कृष्ट व भावस्पर्शी लेखन केलंय आणि करत आहेच . आम्हाला तुझा अभिमान आहे . आज चोपड्या सारख्या तालुका स्थानी संगीत साधना करणारे आणि करवून घेणारे फार दुर्मीळ परंतू आपल्या शहराला लाभलेली ही देणगीच आहे . सरांच्या सानिध्यात आपण सर्वच संगीत साधक आहोत . सरांनी त्यांचे सर्व आयुष्य संगीत साधनेत व्यतीत केले . या साधनेला अशा दुर्मिळ संधी च संधीचं सोने करून देतात . खरोखर हा सुवर्ण क्षण सर्वांनी अनुभवला . खरोखर संगीत ही सरस्वती ची पूजाच आहे . मानसिक शांततेचे साधन आहे .
धन्यवाद
अगदी खरंय सर…आपल्याही संगीत साधनेला वंदन 🙏🏻 धन्यवाद.
खूप सुंदर. Hats off to you 👌👌
Thanks a lot.
अमित, खूप सुंदर लिहिलंय…. संगीत ही सरस्वती देवी ची सर्वात सुंदर आणि सर्वश्रेष्ठ साधना आहे.
मनःपूर्वक धन्यवाद सर.
व्वाह सर! अत्यंत प्रभावी अशी तुमची लेखणी!! आपल्यासारख्या सहृदयी आणि संवेदनशील माणसांची समाजाला गरज आहे.
आपले मनापासून आभार.
अमित, खूप सुंदर, साध्या-साध्या गोष्टींमधून जाणवलेल्या मोठ्या गोष्टी अतिशय ओघवत्या भाषेत सांगितल्या आहेस.
मनापासून धन्यवाद.
Great 👍👍👍👍👍👍 Amit Dada. खूप सुंदर व हृदय स्पर्शी लिहिलंय…
धन्यवाद सर 🙏🏻
Very honest & beautiful description of the experience you had while leaving your niece.
Sir & his students have different bond altogether.👍
I completely agree. Thanks for your comment.