माझं आणि पुस्तकांचं नातं तसं खूप उशिरा जुळू लागलं. खरं सांगायचं तर हे नातं आताकुठे बाळसं धरू लागलंय असही म्हणल्यास वावगं ठरू नये. नाही म्हणायला शाळेत असतांना मी घरच्यांच्या आणि शिक्षकांच्या आग्रहास्तव पुलंची एक दोन पुस्तकं वाचून धमाल एंजॉय केली होती. पण तरीसुद्धा मनापासून वाचनाची गोडी वगैरे त्यामुळे काही निर्माण झाली नाही. कुणी पुस्तकांबद्दल बोलू लागलं की मात्र मला त्याचं भारी कौतुक आणि तात्पुरतं कुतूहल नेहमीच जाणवत असे. नित्यनेमाने अभ्यास, शिस्तबद्ध जीवनशैली आणि पाठ्यपुस्तकांपर्यंतच मर्यादित राहून गेलेलं वाचन, असं माझं लहानपण गेलं.
शालेय जीवन संपून ११ वी – १२ वी साठी महाविद्यालयात जाऊ लागलो. समोर मेडिकलच्या प्रवेशाचं लक्ष असल्याने ह्या दोन वर्षात अवांतर वाचनाचा विचार मनात आणणं पण पाप होतं. पण ह्या दोन वर्षात नकळत दोन बदल आयुष्यात घडले आणि ते लक्षात यायला बरीच वर्ष जावी लागली. विज्ञान शाखेचा अभ्यास सुरु झाल्यावर तुम्ही कधी अतितार्किक होऊन जातात हे तुम्हाला कळतच नाही. म्हणजे पहिला पाऊस पडला की मातीचा तो सुखावणारा गंध तुमच्या नाकापर्यंत पोहोचण्याच्या आत प्रदूषणामुळे त्या पावसाच्या पाण्यात किती ऍसिड तयार झालं असेल ह्याची भिती वाटून आपण घरात पळून जाऊ लागतो. आणि असं अति वैज्ञानिक होऊ घातलेलं मन साहित्याकडे वळणं तसं कठीणचं. आणि दुसरा बदल झाला तो भाषेचा. सगळाच अभ्यास इंग्रजीतून सुरू झाला. शहरात सगळे सहकारी, शिक्षक, वर्गमित्र यांचं साधारण बोलणंपण इंग्रजीतूनच. त्यामुळे मराठी साहित्याशी आणि मराठी भाषेशी मैत्रीची संधी जी सुटली ती पुढे मेडिकलचा अभ्यास पूर्ण होईपर्यंत गवसलीच नाही.
मेडिकल कॉलेज मध्ये ‘वाचणारे’ काही जीवलग मित्र मात्र मिळालेत. आणि ते वाचनाचा आग्रह मला सतत अनेक वर्ष करत राहिले. ह्यातले बहुतेक मित्र इंग्रजी माध्यमात शिकलेले आणि त्यांचं वाचनही बहुतांश इंग्रजीतूनच होणारं. अनेक चांगली इंग्रजी पुस्तकं त्यांनी मला वेळोवेळी सुचवली. ह्या मित्रांमुळे लहानपणी हरवलेलं वाचनाबद्दलचं कुतूहल पुन्हा बहरू लागलं. काही वर्ष डॉक्टर म्हणून कार्यरत राहिल्यावर सरतेशेवटी मी वाचनाकडे वळलो. जवळपास १५ वर्षांचा इंग्रजीचा पगडा आणि मित्रांनी सुचवलेली ती इंग्रजी पुस्तकं, ह्यामुळे मी इंग्रजीतून वाचन सुरू केलं. एलिफ शफाक, खालेद हुसैनी, मीलन कुंदेरा इत्यादींपासून गुरुचरण दास, अमिताव घोष, चेतन भगत, रवी सुब्रमणियन इत्यादींपर्यंत अनेक सुप्रसिद्ध लेखकांची अनेक पुस्तकं मी वाचून फस्त केली. आणि मी एकदाचा साहित्यप्रेमी झालो. ह्या साहित्यातल्या अनेक प्रसंगांशी मी जोडला जाऊ लागलो. त्यातून रोज काहीतरी शिकू लागलो आणि नवीन प्रेरणा घेऊ लागलो.
ह्याच दरम्यान कुणीतरी मला ऑडियो बुक्स बद्दल सांगितलं. आणि मला ही कल्पना खूपच आवडली. प्रवासात असतांना, व्यायाम करताना वगैरे पुस्तक वाचणं शक्य नसतं, पण ते ऐकणं मात्र जमेल असं वाटून मी काही ऑडियो बुक्स चे ऍप्प्स टाकलेत. सुरुवातीच्या काही पुस्तकातचं माझ्या उत्साहावर विरजण पडलं. इंग्रजी ‘वाचून’ जितकी मजा मला आली होती तेवढी ‘ऐकून’ येत नव्हती. नवीन शब्द आला की संदर्भ लागत नव्हता आणि एकूणच हा अनुभव मला फार पचला नव्हता. ह्या सुमारास मला ‘बेल भंडारा’ हे बाबासाहेब पुरंदरे ह्यांचं डॉ. सागर देशपांडे ह्यांनी चितारलेलं चरित्र ऑडियो माध्यमात मिळालं. मराठी पुस्तक ‘ऐकण्याचा’ अनुभव अगदी इंग्रजीच्या विरुद्ध होता. सहज ते मला कळत होतं, भाषेतलं सौंदर्य मनाला अलगदपणे भिडत होतं. माझं शिक्षण मराठी माध्यमात झालेलं, लहानपणापासून घरीसुद्धा वातावरण मराठीच. म्हणूनच कदाचित मराठी पुस्तक ‘ऐकणं’ मला खूपच भावून गेलं. आणि अनेक वर्षांपूर्वी तुटलेली मराठी भाषेशी नाळ पुन्हा जोडली गेली. मी मराठी वाचन सुरु केलं.
इंग्रजी साहित्य खूप समृद्ध आहे. मला वाचनाची गोडी इंग्रजी पुस्तकांनीच लावली. पण मराठी वाचू लागल्यावर काही गोष्टी प्रकर्षाने जाणवू लागल्या. इंग्रजी पुस्तकात मूल आजारी पडल्यावर आई ‘ब्रोकोली सूप’ बाळाला पाजते, आणि तसल्याच प्रसंगात आपली मराठमोळी आई गरमागरम साबुदाण्याची खीर! दोघं प्रसंगातल्या आईची माया सारखीच, तिचं प्रेम त्रिकाळ अबाधितच! पण आयुष्याची चाळीशी ओलांडेपर्यंत कधीही ब्रोकोली बघितली सुद्धा नसलेल्या माझ्यासारख्याला साबुदाणा खीर पाजणारी आई कुठेतरी जास्त जवळची वाटते. एका इंग्रजी पुस्तकात एका गाडीचं वर्णन करताना ८० हजार डॉलर्सची कार असा केला होता. पण वाचन थांबवून Google मार्फत मला जेव्हा कळलं की ही रक्कम म्हणजे जवळपास ६५ लाख रुपये, तेव्हा तो किमतीचा आवाका मनापर्यंत पोहोचला. असंच नावांच्या आणि ठिकाणांच्या बाबतीतही. जॉन, रिचर्ड, रोझ ही पण सुंदर नावांची माणसंच, पण कुठेतरी विक्रम, माया, केशवराव असली नावं असलेली माणसं पुस्तकात जास्त जवळची वाटतात. न्यूयॉर्क, वेलिंग्टन. लिस्टर अश्या प्रसिद्ध ठिकाणांपेक्षा शिमला, त्रिवेंद्रम, जयपूर इत्यादी सारख्या भागातल्या कथानकात मी नकळत जास्त रमतो.
अजून बराच पल्ला गाठायचाय. भरपूर वाचन करायचंय. इंग्रजी वाचायला मला नेहमीच आवडलंय आणि पुढेही मी ते सुरु ठेवणार. पण जेव्हा मन उबदार भावनांच्या तहानेनं व्याकूळ होईल तेव्हा मात्र माझ्या हातात एखादं मायबोलीतलं, मराठीतलं पुस्तक असेल हे मात्र नक्की. तुमच्या वाचन प्रवासात भाषेचा किती आणि कसा प्रभाव पडतो हे नक्की आम्हाला लिहून कळवा…
– अमित.